कोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेमुळे खेळ जगतामध्ये सध्या फुटबॉल फिवर जोरात आहे. कोल्हापुरात तर फुटबॉल हंगाम जवळजवळ बारा महिने सुरूच असतो. कोल्हापूरच्या पेठा-पेठात फुटबॉल खेळाडू आणि फुटबॉल संघ आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या स्पर्धेसाठी रात्रभरची जागरणे आणि दिवसभर चौका चौकात चर्चा हे चित्र दिसत आहे. इंग्लंड संघ या स्पर्धेत आघाडीवर आहे. नुकताच इंग्लंडचा संघ टॉप 8 मध्ये पोहोचला आहे. पण इंग्लंडच्या या कामगिरीवरून कोल्हापुरात मात्र एक 90 वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली आहे. ती म्हणजे 1936 साली त्याकाळच्या ‘ब्रिटन पलटण’च्या संघाबरोबर झालेल्या कोल्हापुरातील प्रॅक्टिस क्लब बरोबरच्या खासबाग मैदानातील सामन्याची. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात प्रॅक्टिस क्लबने ब्रिटन फलटणच्या संघाला शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवून बरोबरीत रोखले होते. चाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या सामन्याचे तंतोतंत वर्णन आजही तितकेच रोमांचक वाटते.
१९३६ चा नोव्हेंबर/डिसेंबरचा महिना असेल. एक ब्रिटिश पलटण (१० आर. टी. मी.) पुण्याहून-बेंगलोरकडे निघाली होती, कोल्हापुरात ताराबाई पार्कच्या बैलगोठा मैदानात या पलटणीचा दोन-तीन दिवसांचा मुक्काम होता. ते प्रॅक्टिसच्या खेळाडूना कळले. या खेळाडूनी त्यावेळी या पलटणीच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना जाऊन आमच्या संघाबरोबर फुटबॉलची मॅच खेळणार का म्हणून विचारले, त्यांनी ते मान्य केले. त्याप्रमाणे खासबाग मैदानात मॅच खेळली गेली. प्रॅक्टिस क्लबची चांगला संघ म्हणून कोल्हापुरात ख्याती होती अशा या संघाशी ब्रिटिश सोल्जर्सचा समावेश असलेला एक बाहेरचा संघ खेळणार, त्यामुळे फुटबॉलशौकिनांत एक आगळेच कुतूहल होते. परिणामी मॅच पाहायला प्रचंड गर्दी झाली. खेळाला सुरवात झाल्यावर काही वेळातच प्रक्टिसच्या मानाने ही ब्रिटिश टीम सुमार असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले. त्या टीममधील एकच खेळाडू चांगला होता, तो म्हणजे त्यांचा गोलरक्षक. या गोलरक्षकाचे गोलरक्षण पाहून सर्व प्रेक्षकांचे नेत्र सुखावून गेले. प्रॅक्टिसच्या अनेक चढाया त्याने निष्फळ ठरविल्या. एकदा तर राईट साईडकडून प्रॅक्टिसने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात बॉल आणला तो अडविण्यासाठी गोलरक्षक प्रयत्न करणार म्हणून प्रक्टिसच्या फॉरवर्डच्या दोन खेळाडूनी या गोल-रक्षकाच्या अंगावर रश केला. सर्वांनी श्वास रोखून धरले. आता जवळजवळ गोलच होणार, अशी प्रेक्षकांना खात्री पटली. पण त्या गोलरक्षकाने दोन्ही कडून येणाऱ्या या खेळाडूंचा हल्ला चलाखीने चुकचुन बॉलचा कब्जा घेऊन पुढे आला आणि प्रॅक्टिसचे खेळाड़ मात्र जाळयात जाऊन आपटले प्रेक्षकांनी टाळयांचा एकच कडकडाट करून गोल-रक्षकाच्या कौशल्याला पसंतीची पावती दिली. चुरशीने खेळली गेलेली ही मॅच मात्र अखेर एक-एक अशा बरोबरीत सुटली.
कोल्हापूरातील प्रॅक्टिस क्लबचा तो ‘ब्रिटन फलटण’ बरोबरचा रोमांचक फुटबॉल सामना
कोल्हापूरातील प्रॅक्टिस क्लबचा तो ‘ब्रिटन फलटण’ बरोबरचा रोमांचक फुटबॉल सामना | sanvadnews
