शिरोली : शिरोली माळवाडी परिसरातील गुंडाच्या टोळीकडून गावात वारंवार खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, अपहरण, गावठी दारू, गांजा विक्री यासह दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांसह व्यवसायिकांना त्रास दिला जात आहे. रेकॉर्डवरील या गुंडांच्या टोळीचा कायमचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन शिरोलीतील सत्तारूढ भाजप-महाडिक गटाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांचेसह सपोनि सुनील गायकवाड आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांना देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून शिरोली, माळवाडी भागातील सातपुते गँग कार्यरत आहे. या टोळीकडून गावठी दारू गांजाच्या विक्रीसह गावात कोयते, कुकऱ्या अशी प्राणघातक हत्यारे घेऊन मारामारी करणे, घरात घुसून तोडफोड करणे, अपहरण करून खूनाचा प्रयत्न करणे, धमकावणे, असे प्रकार केले जात आहेत. या गँगच्या म्होरक्याकडून गावातील तरुणांना दारू गांजाचे व्यसन लावले असून काही तरुणांना गांजा विक्री करण्यास भाग पाडले आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हे दाखल करून अटक, हद्दपारी अशा कारवाया केल्या आहेत. तरीही बेकायदेशीरपणे परिसरात फिरून या गॅंगची दहशत सुरू आहे. त्यानां पोलीस किंवा कायद्याची भीती राहीलेली नाही.यामुळे ग्रामस्थ मात्र भीतीच्या छायेखाली आहेत.
याचा विचार करून शिरोली ग्रामपंचायत पदाधिकारी, सत्तारूढ भाजप-महाडिक गटाचे नेते, कार्यकर्ते यांनी या सातपुते गॅंग ची दहशत मोडून काढून कायमचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांना दिले. तसेच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनाही हे निवेदन दिले. या दहशतवादी टोळीचा बंदोबस्त न केल्यास गावात मोर्चा काढून महामार्ग रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या टोळीला काही राजकीय नेत्यांकडून मिळणारे संरक्षण, सहकार्य, जामीनासाठी केले जाणारे प्रयत्न, आणि आर्थिक मदत यालाही पोलीस खात्याने आळा घालावा अशी ही मागणी या निवेदनात केली आहे.
निवेदन देण्यासाठी जि.प. सदस्य सलीम महात, उप सरपंच विजय जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंच कृष्णात उर्फ पिंटू करपे, राजेश पाटील, दिपक रानमाळे, योगेश खवरे, संदीप तानवडे, संजय पाटील, दिलीप शिरोळे, संभाजी भोसले, दिपक यादव, सचिन गायकवाड, राहूल अष्टेकर, अर्जुन चौगुले, बाळासाहेब पाटील, उत्तम पाटील, अमर जाधव, दिलीप तेलवेकर आदी उपस्थित होते.
शिरोलीत दहशत वाजवणाऱ्या गुंडांच्या टोळीचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
शिरोलीत दहशत वाजवणाऱ्या गुंडांच्या टोळीचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी | sanvadnews
